बारामतीतील जनसागर पाहून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख ढसाढसा रडले, मुलीचेही अश्रू थांबेनात, फाशीच्या मागणीसाठी जनसागर लोटला…

बारामती : मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचे समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे राज्यात वातावरण तापले आहे. मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
यासाठी आज बारामतीत विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी बारामती, इंदापूर, दौंड येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी बारामतीतील जनसागर पाहून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख ढसाढसा रडले, मुलीचेही अश्रू थांबले नाहीत. क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
सध्या यामध्ये जबाबदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांना खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे, अशी मागणी देखील राज्यातून होत आहे. बारामतीत या मोर्चात सर्वपक्षीय नेते सर्व समाज बांधव उपस्थित होते. आरोपींच्या निषेधार्थ घोषणा देत निवेदन देण्यात आले.
सकल मराठा समाज बांधवांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच संतोष देशमुख अमर रहे, खुनाच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांना आरोपी करावे, अशा घोषणा देण्यात आल्या. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, ही प्रमुख मागणी केली आहे.