सणसरकरांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सत्कार, खांब पडले, झाडे पडली, पण तत्परता दाखवून वीज पुरवठा केला सुरळीत…

सणसर : गेल्या चार दिवसांमध्ये सणसर व परिसरामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस, एका वर्षात सरासरी पडणारा पाऊस केवळ चार दिवसातच पडला. त्यातही सोमवार दिनांक 26 मे 2025 रोजी ढगफुटी होऊन सकाळी 9 वाजता चालू झालेला पाऊस संध्याकाळी 4 वाजेनंतरही चालू होता. यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नदी, नाले, ओढे यांना मोठ्या प्रमाणावर पाणी येऊन ग्रामस्थांच्या शेतामध्ये घरामध्ये दुकानांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले.
त्यातही जीवनावश्यक असणारी लाईट जाऊन जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. लोकांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली. अशा बिकट परिस्थितीमध्ये सणसर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सणसर विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून वीज पुरवठा पूर्वरत केला.
यामध्ये असिस्टंट इंजिनियर गवसणे पी एस, ज्युनियर टेक्निशियन काळे व्ही एस, सीनियर ऑपरेटर गाढवे एस जे, उपकेंद्र सहाय्यक भोसले आय एस, सीनियर टेक्निशियन जाधव जी डी, टेक्निशियन तांदळे एस एन, टेक्निशियन बिरादार एस एन, टेक्निशियन सौ गवळी आर एन, विद्युत सहाय्यक देशमुख एस आर, अप्रेंटीस शिंदे ए बी, अप्रेंटिस आर एम व त्यांचे खिंड लढवणारे बहादर मजदूर कर्मचारी वर्ग यांनी तत्काळ कामे सुरू केली.
त्यांनी पाऊस पाण्याची कोणतीही तमा न बाळगता सणसर येथील 11 के व्ही लाईन पेट्रोलिंग करून विभागातील सहाही फिडर तात्काळ कमीत कमी वेळात दुरुस्त करून रात्री 10.45 वाजतां वीज पुरवठा सुरळीत केला. यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे समस्त सणसर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जर वीज पुरवठा लवकर पूर्वरत झाला नसता तर अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तसेच परिसरातील ग्रामस्थांना सामोरे जावे लागले असते. यामुळे कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले जात आहे. सध्या परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.