शबरीमला मंदिराला ३५१ कोटींचे भव्य दान ! पैसे मोजता कर्मचाऱ्यांची दमछाक…!
तिरुवनंतपुरम : केरळच्या शबरीमला मंदिरातील भगवान अय्यपा मंदिरात यावर्षी विक्रमी दान आले. हे दान सुमारे ३५१ कोटींचे असून मंदिर व्यवस्थापनाने नाणी मोजण्यासाठी एकूण ६०० कामगार लावले आहेत. मात्र, दिवसरात्र हे काम सुरू ठेवूनही मोजणी पूर्ण होऊ शकलेली नाही. दरम्यान, ही नाणी मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाल्याने त्यांना काही वेळ विश्रांती देण्यात आली.
मंदिरात ६० दिवसांचा मंडलम-मकरविलक्कू महोत्सव नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झाला. यात भगवान अयप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आले. यावेळी भाविकांनी अर्पण केलेल्या दानाने मागील सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत.
त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे अध्यक्ष के.अनंत गोपाल यांनी सांगितले की, ‘नोटा मोजण्याच्या मशीनने नाणी मोजणे शक्य नाही. नोटा मोजण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, नाणी स्वरुपात मिळालेली देणगी प्रचंड आहे.’ ही नाणी एका मोठ्या खोलीमध्ये ठेवण्यात आली असून त्यांचा खच तयार झाला आहे. तसेच उत्सवादरम्यान मंदिरातून प्रसाद म्हणून अरावण आणि अप्पम दिले जातात. या अप्पमची हुंडी १०० रुपये असून लाखो भाविक हा प्रसाद विकत घेत असल्याने त्यातूनही मोठा महसूल मंदिराला मिळाला आहे.