पुण्यात राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! रुपाली पाटील ठोंबरे देणार राजीनामा? सोशल मीडिया पोस्टने रंगल्या नव्या राजकीय चर्चांना उधाण


पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच पुण्यात अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या भावनिक पोस्टनंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यांनी थेट “मा. अजितदादा, मला माफ करा… आता कठोर भूमिका घ्यावी लागणार,” असे लिहिल्याने त्या पक्षाचा राजीनामा देणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यासंदर्भात त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाची आठवण काढत पक्षातील सध्याच्या परिस्थितीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. “तुम्ही असताना अन्याय करणाऱ्यांवर वचक होता, कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जात होता. पण तुम्ही गेल्यानंतर काहींनी पक्षातील वातावरणच बदलून टाकले,” असा उल्लेख त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांच्या संयमाचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षांतर्गत गटबाजी आणि दडपशाहीवरही निशाणा साधला.

पोस्टमध्ये त्यांनी अन्याय, विश्वासघात आणि दडपशाही यापुढे सहन करणार नसल्याचा इशाराही दिला आहे. “तुमचा शब्द मानून अनेकदा शांत राहिलो, पण आता शांत राहणे शक्य नाही,” असे नमूद करत त्यांनी लवकरच मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय राजकारण केले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विविध सामाजिक, महिला आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली होती. त्यामुळे त्यांचा संभाव्य निर्णय पुण्यातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक समीकरणांवर परिणाम करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतही चर्चांना वेग आला आहे. अशा संवेदनशील राजकीय घडामोडी सुरू असतानाच रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पोस्टमुळे पक्षांतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तथापि, रुपाली पाटील ठोंबरे यांनी अद्याप राजीनामा दिलेला नसून कोणत्याही नव्या पक्षात जाण्याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टचा नेमका राजकीय अर्थ काय, याकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्या भूमिकेमुळे पुण्यासह राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!