विधान भवनाच्या गेटवर राडा; गोपीचंद पडळकरांकडून जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ

पुणे: विधानभवनाच्या गेटवरच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवरती चर्चा होणे अपेक्षित असताना दोन आमदारांमध्ये वाद होऊन प्रकरण शिवीगाळीपर्यंत गेले. विधिमंडळ प्रवेशद्वाराच्या जवळून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड पायी निघाले होते. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी थेट आव्हाड यांच्या दिशेने आली. पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा जोरात पायाला लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. त्यावर आव्हाड यांनी पडखळकरांना जाब विचारला.गाडीचा दरवाजा पायाला लागल्याच्या मुद्द्यावरून पडळकर आणि आव्हाड यांच्यात जोरदार वाद सुरू झाला.
गाडीचा दरवाजा लागल्याच्या कारणावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही नेत्याकडून एकमेकांना शिवीगाळ देखील करण्यात आली. या वादामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
