छत्रपतीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेला खीळ!! कारखान्याची निवडणूक लढविणार, भाजपा किसान मोर्चेचे जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात यांची घोषणा

भवानीनगर : काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत मेळावा घेतला. यामुळे निवडणूक बिनविरोध होणार अशीच शक्यता असताना आता भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव थोरात यांनी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
थोरात हे कारखान्याचे माजी संचालक असून भाजपामध्ये ते कार्यरत आहेत. तानाजीराव थोरात म्हणाले कि, कारखाना बिनविरोध किंवा एकतर्फी करू म्हणून सांगता हे संसदीय लोकशाहीचे लक्षण आहे काय? कालपर्यंत पृथ्वीराज बापू अजित पवार सत्तेचा गैरवापर देत होते, तुम्ही दोघे एक झाल्याने सत्तेचा गैरवापर पृथ्वीराज जाचकांच्या दृष्टिकोनातून अचानक बंद झाला आहे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी तानाजीराव थोरात, अविनाश मोटे, निलेश शिंगाडे, रामभाऊ जामदार, देवेंद्र बनकर, भीमराव भोसले, गोविंदराव देवकाते, गणेश जाधव, अभिजित देवकाते, रवींद्र यादव, संदीप मूलमुले, रघू चौधर, योगेश थोरात उपस्थित होते.
थोरात म्हणाले, प्रशांत काटे यांनी जाचक यांची सगळी प्रकरणे आम्ही बाहेर काढू म्हणून सांगितले होते आता ती तुम्ही बाहेर काढणार की बासनात गुंडाळून ठेवणार? पृथ्वीराज जाचक व अजित दादा आपण दोघे भाऊ भाऊ सत्तेचा वापर फायद्यासाठी करू हेच आपणाला अभिप्रेत आहे का? पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या हिताच्या विरोधी भूमिका घेतल्या हे मी वेळोवेळी सांगेनच, हौसे नवसे फॉर्म भरतील हे वाक्य आदरणीय दादा आपणासारख्या मोठ्या नेत्यांना शोभत नाही.
पृथ्वीराज जाचक व अजित दादा पवार निवडणुकीला एक झाले म्हणून निवडणूक एकतर्फी करू, हे दादा सभासदांना गृहीत धरल्यामुळे बोलत आहेत. कालपर्यंत जे सभासद पात्र नव्हते ज्यांच्या पात्रतेसाठी एवढे दिवस कोर्टामध्ये निवडणूक अडवून धरण्यात आली ते सभासद आपल्या दृष्टिकोनातून आज पात्र झाले का? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.
छत्रपतींचे सभासद सुज्ञ – जागरूक आहेत त्यांना छत्रपती सहकारी साखर कारखाना हा राजकारणापेक्षा त्यांचा स्वतःचा प्रपंच वाटतो, त्यामुळे त्याबाबतीत छत्रपतींचे सुज्ञ सभासद योग्य तो निर्णय घेतील. निवडणूक लांबवण्यासाठी तुमची नुरा कुस्ती चालू होती काय असा प्रश्न सभासदांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.
निवडणुकीपर्यंत विरोधात भूमिका घ्यायची आणि एका रात्रीत उडी मारायची आणि विरोधक पूर्णपणे संपला असं दाखवायचा. पण असे होणे शक्य नाही, आपल्याला कोणाला विचारत घेतले नसून सभासदांना काही गोष्टी मान्य नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यामुळे निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.