टाळ्यांचा न येणार आवाज बोलका!! बारामतीकर हुशार, रोहित पवारांचे ‘ते’ ट्विट चर्चेत….

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शनिवारी बारामतीत उत्स्फूर्त व प्रचंड स्वागत झाल्याची चर्चा सध्या राज्यात सुरू झाली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केल्यानंतर आज संध्याकाळी आमदार रोहित पवार यांनी वेगळेच ट्विट केले आणि त्यानंतर पुन्हा राज्यात पुन्हा एकदा वेगळीच राजकीय चर्चा सुरू झाली.
आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत या सभेतील टाळ्यांवरून भाजपला लक्ष्य केले. या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, बारामतीत झालेली विकासकामे बघता अजितदादा कामाला खरंच ‘दादा’ आहेत आणि बारामतीची जनता कामाला पाठिंबा देणारी असल्याने आजवर झालेली कामे बघता त्यांनी अजितदादांना नेहमीच डोक्यावर घेतले.
पण हे बारामतीकर खूप हुशार आहेत, काल (शनिवारी) अजितदादांच्या भाषणात टाळ्या वाजवायचे आणि भाजपा व त्यांच्या नेत्यांचा उल्लेख झाल्यावर मात्र गप्प बसायचे. हा टाळ्यांचा न येणारा आवाज खूप बोलका आहे आणि तो संपूर्ण राज्यातच ऐकायला मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २६ ) बारामती दौरा केला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर हा पहिलाच बारामती दौरा होता. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी बारामती तालुक्यातील सुपे येथून केली. सुपे येथील टोलेजंग व आलिशान पोलीस इमारतीचे त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी मोरगाव मधील मयुरेश्वराचे देखील दर्शन घेतले व तेथे सपत्नीक पूजाअर्चा केली.
या दरम्यान बारामतीत पोहोचेपर्यंत अजित पवार यांना गावोगावी कार्यकर्ते व नागरिक अडवून त्यांचे स्वागत करत होते, तसेच महिला ओवाळणी करत होत्या. ठिकठिकाणी अगदी क्रेन लावून, जेसीबी लावून पुष्पवृष्टी करून, हार घालून त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत होते. त्यामुळे बारामतीतील कसबा या ठिकाणाहून जी नियोजित मिरवणूक होती, या मिरवणुकीला देखील अजित पवार नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहोचले.
मात्र त्यानंतर संपूर्ण बारामतीत एक मोठा माहोल तयार झाला. यामुळे अजितदादा भारावून गेले होते. ही भावना अजित पवार यांनी सभेच्या दरम्यान सत्काराला उत्तर देताना बोलून दाखवली.
बारामतीकर प्रचंड प्रेम करतात, अशी मिरवणूक मी कधीच पाहिली नव्हती आणि बारामतीच्या रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या देखील एवढ्या कधीच पाहिलं नव्हतं असे त्यांनी बोलून दाखवले. या सभेची फक्त बारामती परिसरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आज दिवसभर चर्चा सुरू होती.