रोहित पवार यांची मोठी घोषणा!! कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार, वेळही सांगितली…

पुणे : अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही मोठ्या वादात पार पडली. शिवीगाळ, हाणामारी असे प्रकार घडले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, वादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो.

या स्पर्धेतील काही नियम अजब होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या.
एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांची चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं.

म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल.
ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो. अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.