Rohit Pawar : रोहित पवारांना लागले मंत्रीपदाचे वेध, भर भाषणात म्हणाले एखादी सही…!! नेमकं काय घडलं?
Rohit Pawar : आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला तर मविआ ला मोठे यश मिळाले. लोकसभेला मिळालेल्या अपयशाचा वचपा काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे मविआ नेही रणनीती आखत मोर्चेबांधणीस सुरुवात केलेली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील लोकार्पण सोहळ्यात केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
एमआयडीसीच्या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले , महाराष्ट्रात शरद पवार साहेब , उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांनंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. Rohit Pawar
त्यामुळे आपल्या एमआयडीसीच्या पेपरवर जर आताचे मंत्री सही करणार नसतील तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पवार साहेबांच्या आशीर्वादाने आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याची सही MIDC च्या कागदावर असू शकते, असे म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आमच्या पक्षाचे सर्व खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा संसदेतील आवाज बनून महाराष्ट्राचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतील आणि ते सोडवण्याचे काम करतील असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.