Rohit Pawar : मॅक्सवेलने केला मैदानावर राडा अन् रोहित पवारांनी केली थेट शरद पवारांसोबत तुलना, नेमकं काय म्हणाले रोहितदादा?

Rohit Pawar : वर्ल्डकपमध्ये मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ आमने-सामने आले असता क्रिकेटरसिकांना जबरदस्त सामना अनुभवण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ समोर असतानाही अफगाणिस्तानने त्यांना झुंजवत सामना आपल्या दिशेने झुकवला होता.
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या संघामध्ये झालेल्या रोमांचक सामन्यानंतर सगळीकडे ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वादळी खेळीची चर्चा सुरू आहे. क्रिकेटरसिकांसाठी हा सामना एक पर्वणीच होती. या सामन्यानंतर संपूर्ण जगभरातून मॅक्सवेलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. फक्त क्रीडाच नाही तर राजकारणातही याचे पडसाद उमटत आहेत. Rohit Pawar
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी मॅक्सवेलच्या या खेळीची तुलना शरद पवार यांच्या राजकीय संघर्षाशी केली आहे. मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं असं सांगत रोहित पवारांनी शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेचा उल्लेख केला आहे. एक्सवर त्यांनी पोस्ट शेअर करत यामध्ये शरद पवार आणि मॅक्सवेलचा फोटो शेअर केला आहे.
रोहित पवारांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, परिस्थिती कितीही विरोधात असली, मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागते. नुसतं लढावंच लागतं असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागत अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते. मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिले.
काल ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेला सामना स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २९१ धावांचे आव्हान उभे केले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरुवातीपासूनच कोलमडली होती.
तसेच त्यांचे ७ फलंदाज ९१ धावांत माघारी परतले होते. मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने ऐतिहासिक खेळी करताना ऑस्ट्रेलियाला सनसनाटी विजय मिळून दिला होता. दरम्यान रोहित पवार यांनी शेअर केलेल्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.