रिंग रोड, दुहेरी बोगदा अन् उन्नत मार्ग; पुण्याची वाहतूककोंडीतून सुटका? जाणून घ्या गेमचेंजर प्लॅन


पुणे : पुण्यातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांचे शनिवारी ऑनलाइन भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवे घाटात दुहेरी (ट्विन) टनेल उभारण्याची घोषणा केली.

फडणवीस म्हणाले की, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास जलद आणि सुलभ करण्यासाठी दिवे घाटात ट्विन टनेल उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या बोगद्यात भविष्यात रस्त्यासोबत मेट्रो मार्गाचीही तरतूद केली जाणार आहे.

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक जमिनीपैकी 50 टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले असून, 91 टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ऑगस्टपर्यंत संपूर्ण भूसंपादन पूर्ण करून यावर्षीच विमानतळाच्या कामाची निविदा काढण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी 173 किमी बाह्य रिंग रोड आणि 86 किमी अंतर्गत रिंग रोड उभारण्याचे काम सुरू असून, पुढील दोन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूककोंडीत सुमारे 30 टक्के घट होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

याशिवाय, 36 किमीच्या HCMTR प्रकल्पाचे काम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असून, भविष्यात भूमिगत वाहतूक व्यवस्थेच्या ‘पाताललोक’ संकल्पनेवरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख प्रकल्प
पुणे–शिरूर : 31 किमी सहापदरी उन्नत मार्ग, प्रवासाचा वेळ 2 तासांवरून 45 मिनिटांवर.
हडपसर–यवत : 25 किमी उन्नत मार्ग; पुरंदर विमानतळ, NH-65 आणि रिंग रोडशी थेट जोडणी.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर : 26 किमी बहुस्तरीय उन्नत मार्ग; चाकण औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!