रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! पुण्यातील ‘या’ बँकेवरचे सर्व निर्बंध हटवले, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाखाली आलेली पुणे सहकारी बँक अखेर मोकळा श्वास घेणार आहे. रिझर्व्ह बँकेने निर्बंध उठवल्यामुळे बँकेचे व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले असून, सुमारे साडेसात हजार खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच २०२३ मध्ये आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने पुणे सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लागू केले होते. या निर्बंधानुसार बँकेला नवीन ठेवी स्वीकारण्यास आणि कर्जवाटप करण्यास मनाई करण्यात आली होती.

तसेच खातेदारांना त्यांच्या खात्यातून केवळ पाच हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढण्याची परवानगी होती. परिणामी अनेक लहान बचतदार आणि व्यावसायिक अडचणीत आले होते.त्यावेळी बँकेच्या कामकाजात गोंधळ निर्माण झाला होता. ग्राहकांचा विश्वास डळमळीत झाला, तर बँकेच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला. अनेक खातेदारांनी आपले पैसे इतर बँकांमध्ये हलवले, तर काहींनी बँक पुन्हा पूर्ववत होईल या आशेवर वाट पाहिली. या सर्व घडामोडींमुळे पुणे सहकारी बँकेसमोर विश्वास पुनर्स्थापित करण्याचे आव्हान उभे राहिले.

बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासनाने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. सहकार खात्याकडून सहाय्यक निबंधक प्रगती वाबळे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यांनी तातडीने सुधारणा प्रक्रियेची सुरुवात केली.
प्रगती वाबळे यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रशासकीय पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बँकेच्या वसुलीवर विशेष भर दिला. त्याचबरोबर अनावश्यक खर्चात कपात करून बँकेचा आर्थिक ताळमेळ साधण्यात यश मिळवले.
दरम्यान, त्यांनी प्रत्येक तिमाहीला रिझर्व्ह बँकेच्या तपासणी पथकाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले आणि बँकेच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणली. त्यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या दहा वर्षांपासून तोट्यात असलेली बँक मागील वर्षात प्रथमच नफ्यात आली. हा सकारात्मक बदल रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर अखेर निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाबळे म्हणाल्या, आम्ही वसुली वाढवून आणि खर्च कमी करून बँकेचा आर्थिक तोल पुन्हा प्रस्थापित केला. रिझर्व्ह बँकेने नियमित तपासणी करत सूचना दिल्या आणि त्या सूचनांचे पालन केल्यानेच आज हा दिवस पाहायला मिळाला. निर्बंध उठल्यामुळे बँकेचे कामकाज आता सुरळीतपणे सुरू झाले असून, खातेदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
