भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव; अरुणाचल प्रदेशात सैनिक आमनेसामने, ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव पुन्हा चर्चेत आला आहे. अरुणाचल प्रदेशातील सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिक अनेक ठिकाणी आमनेसामने आले असून, परिस्थिती अद्याप कायम असल्याची माहिती भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे (ITBP) महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सीमावर्ती भागातील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

अरुणाचल प्रदेशात नेमकं काय घडलं?
ITBP महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी राजस्थानमधील अलवर येथे जवानांना संबोधित करताना अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती परिस्थितीचा उल्लेख केला. अलीकडच्या काळात या भागात अनेक ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिक आमनेसामने आले होते आणि परिस्थिती अजूनही कायम असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी ITBPच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘शौर्य कमांडो’ पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले.


यापूर्वी ६ सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील वाचा-दमाई येथे भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतरही सीमावर्ती भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
सीमेवरील सुरक्षा मजबूत करण्यासाठी ITBPची तयारी
सीमेवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी ITBPकडून दलाचे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक सीमावर्ती बटालियनमध्ये ड्रोन पथके तयार करण्यात आली असून, ड्रोन आणि ड्रोनविरोधी यंत्रणांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तसेच, युद्धाच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्ट्राइक’ हा प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. गालवानसारख्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जवानांची तयारी अधिक सक्षम करण्याचा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. २०२७ च्या अखेरपर्यंत संपूर्ण दलाला हे प्रशिक्षण देण्याचे नियोजन असल्याचेही सांगण्यात आले.
सीमेवर भूमिगत संरचना उभारण्यावर भर
आधुनिक युद्धात जमिनीवर तैनात असलेल्या जवानांना विविध प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सीमावर्ती चौक्यांवर भूमिगत संरचना आणि सुरक्षित आश्रयस्थळे उभारण्याचे काम सुरू असल्याचे कपूर यांनी सांगितले. यासोबतच शस्त्रास्त्रे, वाहने आणि इतर आवश्यक साधनांचे आधुनिकीकरण करण्यावरही भर दिला जात आहे.
काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका
ITBP प्रमुखांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारच्या चीनविषयक धोरणावर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती परिस्थितीबाबत केंद्र सरकारने अधिक स्पष्ट माहिती द्यावी, अशी भूमिका मांडली. सीमावर्ती भागातील घडामोडी, गस्त घालण्याच्या मुद्द्यांवरील चिंता आणि चीनसोबतची व्यापारी तूट यांचाही त्यांनी उल्लेख केला.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती परिस्थिती आणि भारत-चीन संबंधांमधील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
