मुरीलधर मोहोळांविरोधात रवींद्र धंगेकरांचं थेट पंतप्रधानांना साकडं; पत्रात काय आहे तो गंभीर आरोप? कारवाई होणार का?

पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्रीप्रकरणात आता वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना काल जैन बांधवांनी जाब विचारला तर जैन मुनींनी आयोजित केलेल्या बैठकीला ते हजर राहिले.

तसेच त्यांनी यावेळी आपल्या याप्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसल्याची बाजू मांडली. दरम्यान शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कारवाईसाठी साकडं घातलं आहे. त्यांनी मोहोळांविरोधात पत्र लिहिलं आहे.

जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहार वादानंतर जैन मुनी श्री गुप्ती नंदीडी महाराजांनी एक बैठक घेतली. त्यात मुरलीधर मोहोळ यांनी सहभाग घेतला. ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन बसले. त्यानंतर त्यांनी जैन मुनींसमोर नारळ ठेवला आणि आशीर्वाद मागितला. जैन मुनींनी त्यांना नारळ देत आशीर्वाद दिले.

काल जैन बांधवांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना घेराव घातला. जैन बोर्डिंग जमीन वादाबाबत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यावेळी मोहोळ यांनी आपला या प्रकरणात काहीही संबंध नसल्याची बाजू मांडली.
दरम्यान, जैन मुनी यांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी रेटली. जर याविषयी सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर 1 नोव्हेंबरपासून उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता याप्रकरणात मोठे आंदोलन उभे राहिल्याचे समोर येत आहे. रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा उद्यापासून धरणं आंदोलनाची घोषणा केली आहे. एकूणच जमीन व्यवहार प्रकरण तापल्याचे दिसून येते.
मोदींना धंगेकरांचे पत्र
जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकर २७ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे.
जैन बोर्डिंगच्या जमिनीची पाहणी केली तेव्हा मोहोळ बिल्डरचे पार्टनर होते. मोहोळ केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ट्रस्टच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले तिन्ही कंपन्यांचे मालक मोहोळांचे निकटवर्तीय गोखले कन्स्ट्रक्शनने २३० कोटींना संबंधित जमीन विकत घेतल्याचा गंभीर आरोप रवींद्र धंगेकरांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
