मेट्रोच्या नावाखाली जनतेचा पैसा वाया घालवू नये ! आ. रवींद्र धंगेकर यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप …..

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने विरोधकांनी आता निशाणा साधला आहे. मोदींचा दौरा रद्द झाल्याने त्यांच्या हस्ते होणारी उद्घाटनेही रद्द झाली आहेत. दरम्यान आता याच मुद्यावरून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी आहे. जनतेचा पैसा वाया घालवू नये, टप्प्याची उद्घाटनं काही महत्त्वाची नाहीत. राज्यातील इतर नेत्याने, पालकमंत्र्याने उद्घाटन केले असते तरी चालले असते. पण, विनाकारण पैसे खर्च केले जात आहेत. मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात येत आहेत. एक पुणेकर म्हणून हा खर्च टाळावा असं धंगेकर यांनी सांगितलं.
रवींद्र धंगेकर म्हणाले, पंतप्रधान मोदी पुण्यातील टप्प्या-टप्प्याच्या मेट्रोच्या उद्घाटनासाठी येतात. यामुळे राज्याच्या, देशाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडतो. याची कल्पना देखील या नेत्याला येत नाही. करोडो रुपयांचा चुराडा या दौऱ्यानिमित्ताने होणार होता आणि तो झाला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उद्घाटनाचा घाट घातला गेला. पुण्यासाठी काहीतरी करतोय असे दाखवण्याचा हा प्रयत्न होता, असं धंगेकर म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, राजकारण बाजूला ठेवून पुणे मेट्रोचे उद्घाटन करायला हवे. आता पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा मान्यवरांच्या हातून उद्घाटन करून हा भुयारी मार्ग सुरु करण्यात यावा. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्ग प्रवाशांसाठी आज सुरु करण्यात यावा. यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यात येऊ नये. अशी आमची नरेंद्र मोदी आणि प्रशासनाला विनंती आहे, असं ते म्हणाले.