लोणी काळभोर येथील प्रसिद्ध रामदरा देवस्थानला रामनवमीनिमित्त रामजन्मोत्सव उत्साहात; दिवसभरात दिड लाख भाविकांची हजेरी…!


उरुळी कांचन : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील प्रसिद्ध स्थळ रामदरा शिवालय येथे आज रामजन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने अपुर्व उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे दिड लाखापेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक १००८ देविपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी गेल्या साठ वर्षांपुर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केले आहे. तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आजही पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महामस्तकाभिषेक करून श्रींची आरती करण्यात आली. दुपारी ढोल ताशांच्या गजरात “श्री” समवेेत धुंदीबाबा व मंगलपूूूरी महाराज यांच्या पादूूूकांंची मिरवणूक काढण्यात आली होती.

यावेळी लोणीकाळभोर गावातील तरवडी – रानमळा, केसकरवस्ती, वडकी येथील समाज बांधवानी गजनृत्य सादर केले. ढोलाच्या तालावर पडणारे लयबद्ध पदन्यास पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. मिरवणूकीमध्ये लोणी काळभोर, फुरसुंगी गावातील नागरिकांसह पुणे, पिंपरी – चिंचवड, सातारा तसेंच परप्रांतातून आलेले भाविक व पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. दुपारी बारा वाजता महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते रामजन्मोत्सवाची आरती करण्यात आली. त्यानंतर भंडारा व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. पाडव्यापासूूून सुरू असलेल्या अखंंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता झाली.

रामजन्माचा सोहळा झाल्यानंंतर भात, आमटी, बुंदीचा महाप्रसाद देण्यात आला. दर्शन व प्रसाद घेण्यासाठी आबालवृद्ध, महिला, तरुण भक्तांची झुंबड उडाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५५ स्वयंसेवक आलेल्या भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग व्यवस्थित व्हावे म्हणून उपाययोजना करताना दिसत होते. यांमुळे आलेली दुचाकी व चारचाकी वाहने  मुख्य प्रवेशद्वाराच्या सुमारे एक हजार फूट अलीकडेच थांबवल्याने भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवला नाही. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचा चोख बंदोबस्त सकाळपासूनच लावण्यात आला होता. त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. रात्री उशिरापर्यंत विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!