Ram Navami 2024 : अयोध्येत रामलल्लाचा सूर्यतिलक, संपूर्ण रामनगरी फुलांनी सजली…
Ram Navami 2024 : अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभी श्री रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनवमी आहे, त्यामुळे रामभक्तांसाठी हा सोहळा उत्साहाचा आहे. रामलल्लाचा दिव्य राज्याभिषेक झाला तर झालाच पण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ते रामलल्लाचा ‘सूर्यतिलक’ दुपारी १२ वाजता रामलल्लाचे सूर्य तिलक करण्यात आले.
खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामलल्लाच्या कपाळाच्या मधोमध पडल्याचे दिसून आले. ‘सूर्यतिलक’चा हा अनोखा आणि अद्भूत अनुभव देशभरातील सर्व रामभक्तांना याची देही, याची डोळा पाहता आले.
अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे सूर्यकिरणं दरवाज्यातून नाही, तर ती घुमटातून आली. रामजन्म, म्हणजे ठीक मध्यान्हाच्या वेळी दुपारी 12 वाजता सूर्यकिरणं रामललाच्या माथ्यावर पडली.
घुमटाच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा आधार घेतला गेला. या सिस्टिममध्ये अभिषेकासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे – दोन आरसे, एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेसनी.
सगळ्यात मोठी लेन्स मंदिराच्या छतावर बसवली गेली होती. ती रिफ्लेक्ट होऊन ही किरणं पहिल्या आरशावर परावर्तीत केली गेली आणि मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या दोन लेन्समधून प्रवास करत ही किरणं रामललाच्या कपाळावर पडली.
‘सूर्यतिलक’ मागचे ऑप्टोमेकॅनिकल तंत्रज्ञान…
सूर्यकिरणे एका जागेतून प्रवेश करतील. ती या उपकरणाच्या लेन्सवर पडतील.
तेथून ती परावर्तित करण्यात येतील. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा आरसा एका ठराविक कोनात बसविण्यात आला.
तिस-या मजल्यावर शिखराजवळ ऑप्टोमेकॅनिकल यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेला ‘सूर्य तिलक’ नाव दिले आहे.
सूर्यप्रकाश श्रीरामलल्लांच्या ललाटी आणण्यासाठी प्रकाशाचा मार्ग परावर्तित करण्यात आला. परावर्तित किरणे गाभा-यापर्यंत पोहोचवली.
गाभा-याच्या बाहेर असलेल्या ठराविक कोनातील आरशामुळे तेथून सूर्यकिरणांनी परावर्तित होऊन श्रीरामलल्लाच्या कपाळाचा स्पर्श केला.