रमेश बैस यांनी घेतली राज्यपाल पदाची शपथ…!

मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आज रमेश बैस यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन,अशी प्रतिज्ञा रमेश बैस यांनी घेतली. महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात तीव्र लाट उसळली होती. अखेर कोश्यारी यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्याच आठवड्यात त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला होता. आज राजभवनात बैस यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडला आहे.
कोण आहेत रमेश बैस?
रमेश बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला. सध्या रायपूर हे छत्तीसगडमध्ये आहे. 1978 मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महापालिकेत नगरसेवक पदावर ते निवडून आले. तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर 1980 ते 1984 या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य बनले. 1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले. तिथे रमेश बैस यांनी विजय संपादन केला. त्यानंतर पोलाद आणि खाण राज्यमंत्री, रासायनिक खते राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्यमंत्री, खाण मंत्रालय, पर्यावरण आणि वन मंत्रालय, त्रिपुराचे राज्यपाल , झारखंडचे राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.
राज्यपाल का बदलले?
यापुर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून महाराष्ट्राविरोधात अनेक अवमानकारक उद्गार काढले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात वक्तव्य केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती.
राज्यपालांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी राज्यभरात अनेक आंदोलनं करण्यात आली. भगतसिंह कोश्यारी यांचे पुतळेही जाळण्यात आले. केंद्र सरकार राज्यपालांवर कठोर भूमिका घेत नाही, अशी संतप्त टीका करण्यात येत होती. अखेर राज्यपाल कोश्यारी यांनीच राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.