गणरायाच्या स्वागताला पाऊस येणार, राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी…

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळपासूनच मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. सकाळी शाळा-कामासाठी निघालेल्या नागरिकांची मोठी तारांबळ झाली.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तास राज्यासाठी धोक्याचे ठरू शकतात. गेल्या आठवड्यातच मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन कोट्यवधींचे पिकांचे नुकसान झाले होते.
त्यानंतर थोडी उसंत मिळाली होती, मात्र आता पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरासह मध्यप्रदेशात निर्माण झालेल्या दाबामुळे महाराष्ट्रावर पावसाचे ढग दाटले आहेत.

हवामान विभागाने कोकण व मराठवाड्यासह घाटमाथ्यावरील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात येलो अलर्ट लागू आहे.

दरम्यान, मुंबईत सकाळपासूनच वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रस्त्यांवर पाणी साचू लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.
तसेच मुंबईसह उपनगरात काही तासांपासून जोरदार पावसामुळे लोकल सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे प्रशासनाने आधीच उपाययोजना सुरू केल्या आहेत.
हवामान विभागाचा अंदाज आहे की, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.