राज्यात ‘या’ तारखेनंतर राज्यभर पाऊस सक्रीय होणार! जाणून घ्या महत्वाची माहिती..

पुणे : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होताना दिसत आहे. पुणे शहर आणि कोकणात पावसाचा जोर लक्षणीय वाढला असून, अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तसेच बुधवारी रात्री पुण्यात आणि कोकणातील काही भागात जोरदार सरी कोसळल्या. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी पुढील काही दिवसांत हवामान आणखी खवळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या घाटमाथ्यालगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे घाटमाथ्यावरून येणाऱ्या नद्यांचा विसर्ग वाढणार आहे.
पुणे शहरासह खडकवासला धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाटबंधारे विभागाने रात्री १२ वाजल्यापासून ६४५१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. विसर्गाची पातळी पावसाच्या तीव्रतेनुसार समायोजित केली जाणार आहे.
हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती देताना स्पष्ट केलं की, ६ जुलैपासून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. या कालावधीनंतर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्येही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात गुरुवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, काही भागांत ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यातील शेतकरी वर्गाला या पावसाची प्रतीक्षा असल्याने, ६ जुल्यानंतर पावसाचा जोर वाढणे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
दरम्यान, पुणे परिसरात धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाण्यात माती व गाळ मिसळल्याने पाणी गढूळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांकडून पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेने जलशुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक तीव्र केली असून, नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.