विश्रांतीनंतर राज्यात पावसाची उसंत, राज्यातील ‘या’ भागाला हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा…

मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीस समाधानकारक पाऊस न झालेल्या मुंबईत अखेर रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांनी या पावसाचे स्वागत आनंदाने केले.

तसेच राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकणासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, काही भागांत मुसळधार पाऊस आणि विजांचा गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून, या भागांमध्ये देखील वाऱ्याचा जोर आणि विजांचा धोका वाढलेला आहे.
सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी झाडांच्या खाली थांबणे टाळावे आणि विजेच्या तारा, सैल झालेली संरचना यांपासून दूर राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.
पालघरमध्ये देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मच्छीमार, शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील भागांत पावसाचा जोर अधिक असणार आहे. नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे, कारण पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे