पुण्यात रेव्ह पार्टीनंतर जुगार अड्ड्यावर छापा ; पोलीस अधिकाऱ्यालाच रंगेहाथ पकडले…

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातील खराडी परिसरातील एका फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांना छापा टाकला होता. या पार्टीनंतर आता पुणे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलिस फौजदारासह ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नारायण पेठेत वाहनतळामध्ये हा जुगार सुरु होता. जुगार खेळताना पुणे पोलिसांनी 33 जणांना अटक केली आहे. आरोपीमध्ये सहाय्यक पोलीस फौजदाराचा ही समावेश असल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महेश महादेव भुतकर असे या सहाय्यक पोलीस फौजदाराचे नाव आहे.पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याने भुतकर यांना निलंबित करण्यात आले आहे. ते सध्या मुख्यालयातील सी कंपनीत कार्यरत होते. पोलिसांनी त्यांच्यासह 33 जणावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान हा जुगार अड्डा विजय महाडिक हा चालवत असून त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई केली आहे.विश्रामबाग पोलिसांना नारायण पेठेतील हरीभाऊ साने वाहनतळामध्ये काही जण पैसे लावून रम्मी हा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या वाहनतळाला वेढा देऊन छापा टाकला. त्यात वाहनतळाच्या टेरेसवरील खोलीमध्ये ३३ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून खेळातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ३३ जणांमध्ये सहाय्यक पोलिस फौजदाराला पकडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
