पुण्याचा भोंदूबाबा गुंगीचे औषध देऊन भक्तांसोबत करायचा अश्लील चाळे, उपायाला विरोध केल्यास चिठ्ठीवर तारीख लिहायचा, ‘या’ दिवशी तुझा मृत्यू होणार…


पुणे : अंधश्रद्धेचा फायदा घेत भक्तांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाची हायटेक विकृती समोर आली आहे. भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाउनलोड करून त्यांचे खासगी क्षण पाहणारा भोंदूबाबा भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळेही करायचा.

प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद तामदार (वय २९, रा. सूस गाव, मुळशी) या तथाकथित बाबावर बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, त्याच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे.

आरोपी भोंदूबाबा भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाऊनलोड करून त्यांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवत असे. याशिवाय, तो भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करत होता. या कृत्याची झलक तपासात पाच वेगवेगळ्या भक्तांच्या चौकशीतून समोर आली आहे.

बाबा स्वतःला भक्तांचे दोष स्वतःवर घेतो, त्यांच्यावर संकट आहे, आणि त्यासाठी विशिष्ट उपाय करतो, अशी बतावणी करत असे. एखादा भक्त त्याच्या या नीच कृतीला विरोध करत असे, तर तो एका कागदावर मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत असे, की त्या दिवशी तू मरशील! त्यामुळे अनेक भक्त मानसिक दबावाखाली त्याच्या सांगण्यानुसार वागत होते.

या प्रकरणातील आरोपी भोंदूबाबाच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला काल (मंगळवारी) न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आरोपीकडून तीन मोबाइल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्डसह अस्वस्थता आणि निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट देखील जप्त करण्यात आली आहेत. ‘आरोपीने भक्तांचे खासगी क्षण ‘हिडन ॲप’द्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीने पुरुषांप्रमाणेच महिला व लहान मुलांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्याने स्थापन केलेली संस्था कायदेशीर आहे का, यासह विविध मुद्द्यांवर तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी,’ अशी मागणी तपास अधिकारी उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!