पुणे हादरले! देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका; भीषण स्फोटात आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा करुण अंत

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी परिसरात शुक्रवारी सकाळी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली.

घरात नवीन गॅस सिलिंडर जोडत असताना रेग्युलेटरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा तरुण मुलगा होरपळून मृत्युमुखी पडले, तर सून आणि सहा वर्षांची नात किरकोळ जखमी होऊन बचावल्या.
मृतांमध्ये विष्णू मुंजाजी गित्ते (80), वृंदाविनी विष्णू गित्ते (60) आणि त्यांचा मुलगा पांडुरंग विष्णू गित्ते (35) यांचा समावेश आहे. पांडुरंग गित्ते हे एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी राजश्री गित्ते (32) आणि मुलगी निहारिका (6) या जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, घरातील गॅस सिलिंडर संपल्यानंतर वृंदाविनी गित्ते नवीन सिलिंडर जोडत होत्या. त्यावेळी रेग्युलेटरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. ही बाब लक्षात येताच पांडुरंग आणि विष्णू गित्ते त्यांच्या मदतीला धावले. मात्र काही क्षणांतच घरात गॅसचा स्फोट झाला आणि तिघेही गंभीररीत्या भाजले.

आधी मुलगा, नंतर वडील आणि अखेर आईचीही मृत्यूशी झुंज अपयशी
स्फोटाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देत जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दुपारी सर्वप्रथम पांडुरंग गित्ते यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वडील विष्णू गित्ते आणि सायंकाळी आई वृंदाविनी गित्ते यांचीही प्राणज्योत मालवली. एकाच दिवसात एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
देवघरातील दिव्यामुळे झाला स्फोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस गळती लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी घर वाचवण्यासाठी सिलिंडर सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सिलिंडर स्वयंपाकघरातून उचलून हॉलमध्ये आणला होता. मात्र हॉलमधील देवघरात दिवा सुरू होता. तोपर्यंत संपूर्ण घरात एलपीजी गॅस पसरला होता. दिव्याच्या ज्योतीच्या संपर्कात गॅस येताच आग भडकली आणि भीषण स्फोट झाला.
पत्नी बाथरूममध्ये असल्याने बचावली
या दुर्घटनेतून बचावलेल्या राजश्री गित्ते यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. घटनेच्या वेळी त्या बाथरूममध्ये अंघोळ करत होत्या. अचानक आरडाओरडा ऐकून त्या बाहेर येण्याच्या तयारीत असतानाच स्फोट झाला. त्यामुळे त्या आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी निहारिका थोडक्यात बचावल्या.