Pune Ring Road : पुण्याच्या रिंगरोडला मिळणार गती, पश्चिम मार्गावरील जमिनीचे भूसंपादन, शेतकऱ्यांना पाठवल्या नोटीसा…
Pune Ring Road : पुण्यातील रिंगरोडच्या बाबतीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोड प्रकल्पाच्या पश्चिम मार्गावरील ३४ गावांपैकी ३१ गावांमधील ६४४ हेक्टर जमिनीच्या संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता कामांना गती मिळणार आहे.
आता त्यासाठी २ हजार ९७५ कोटींचा मोबदला दिला आहे. भोर तालुक्यातील पाच गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झाल्याने या गावातील मूल्यांकनाचे दर निश्चितीचे काम सुरू आहे. लवकरच याचा देखील मोबाईल निश्चित करून तो दिला जाणार आहे.
तसेच पूर्व मार्गावरील हवेली, मावळ, खेड आणि पुरंदर येथील जमिनीच्या भूसंपादनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. यामुळे त्या तालुक्यातील देखील कामे लवकर पूर्ण होणार आहेत.
याबाबत रिंगरोडच्या कामाची नुकतीच आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, रस्ते महामंडळाचे अपर जिल्हाधिकारी हणुमंत आरगुंडे, पूर्वेकडील भोर, हवेली, खेड आणि पुरंदर तालुक्यांचे प्रांत अधिकारी, तहसीलदार बैठकीस उपस्थित होते. यामध्ये वेगवेगळ्या विषयांची चर्चा करण्यात आली. Pune Ring Road
सध्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात वाहतूक कोंडी होत आहे. ती सोडवण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ कि.मी. लांबी आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये पूर्व मार्गावर मावळातील ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे.
तसेच खेड तालुक्यातील भूसंपादनाबाबत बाधित गावातील शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या आहेत. शेतकन्यांकडून स्वयंघोषणा पत्र घेण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित मावळ तालुक्यातील ११ आणि हवेली तालुक्यातील १५ गावांबाबत तातडीने भूसंपादन करण्यासाठी आता पावले उचलली आहेत.