पुणेकरांनो सावधान! विकेंडला फिरायला जाणार असाल तर आधी हे वाचा; ‘या’ पर्यटनस्थळांसाठी रेड अलर्ट

पुणे : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, गुजरात किनारपट्टीपासून अरबी समुद्रापर्यंत सक्रिय झालेल्या द्रोणीय रेषेमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे शहरात आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज असून, दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, लोणावळा, ताम्हिणी आणि घाटमाथ्यावरील भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विकेंडला पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण 95 टक्के भरले असून, धरणातून पवना नदीपात्रात सुमारे 7 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


गेल्या 24 तासांत थेरगाव, चिंचवड, लोहगाव, एनडीए आणि पाषाण परिसरात पावसाचा जोर अधिक होता. संध्याकाळनंतर काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
यंदाच्या मान्सूनमध्ये पुण्यात 1 जून ते 23 जुलै या कालावधीत सरासरी 287.7 मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल 536 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांतही नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.