पुणेकरांनो, विमान प्रवास महागला! तिकिटांच्या दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ, सणासुदीत खिशाला बसणार झळ

पुणे : सणासुदीच्या काळात विमान प्रवासाचे दर वाढल्याने पुणेकरांचे प्रवासाचे नियोजन कोलमडले आहे. पुणे ते बंगळुरू, दिल्ली तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमान तिकिटांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे.

दिवाळी आणि उत्तर भारतातील छठपूजेच्या काळात गावी जाणाऱ्या तसेच सहलीचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. वाढलेल्या तिकीट दरांमुळे काही प्रवाशांनी विमान प्रवास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, दर कमी होण्याच्या अपेक्षेने आगाऊ बुकिंग करण्याऐवजी प्रतीक्षा करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
विमान तिकीट दरात ३० ते ४० टक्क्यांची वाढ


पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधन अर्थात एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ)च्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांनी तिकिटांवर आकारल्या जाणाऱ्या इंधन अधिभारात वाढ केली आहे. हा अधिभार १०० रुपयांपासून ते १,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
एअर इंडिया समूहाने एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या देशांतर्गत मार्गांवरील इंधन अधिभार वाढवला आहे. तसेच, इंडिगोनेही ६ ऑक्टोबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी अंतरानुसार इंधन शुल्कात बदल केला आहे. या बदलांचा थेट परिणाम विमान तिकीट दरांवर झाला आहे.
दुसरीकडे, दिवाळी आणि उत्तर भारतातील छठपूजेच्या काळात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे मागणी वाढल्यानेही तिकिटांचे दर चढले आहेत. एकूणच, विमान तिकीट दरांत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने यंदा सणासुदीच्या काळात प्रवास करणे महागले आहे.
पुणे ते बंगळुरू प्रवासासाठी आता १० हजारांपर्यंत खर्च
विमान तिकीट दरवाढीचा सर्वाधिक फटका पुणे ते बंगळुरू मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. यापूर्वी या मार्गावरील एकेरी तिकिटासाठी साधारण पाच हजार रुपये खर्च येत होता. मात्र, आता ऑक्टोबरमधील प्रवासासाठी आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागत आहेत.
वाढलेल्या दरांचा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे. पुणे ते दिल्ली एकेरी प्रवासासाठी सध्या नऊ ते दहा हजार रुपये खर्च येत आहे. तर पुणे ते दुबई प्रवासासाठी २० ते २२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी दुबईचे तिकीट १२ ते १५ हजार रुपयांत उपलब्ध होत होते.
सहलीचे नियोजनही महागले
पुण्यातून सहलीसाठी बागडोगरा येथे जाणाऱ्या प्रवाशांनाही वाढलेल्या विमान तिकीट दरांचा फटका बसत आहे. यापूर्वी बागडोगरा येथील येण्या-जाण्याचे तिकीट १५ हजार रुपयांत मिळत होते. आता त्यासाठी २० हजार रुपयांहून अधिक खर्च करावा लागत आहे.
दरम्यान, स्पाइसजेटची पुणे-दुबई विमानसेवा तात्पुरती बंद आहे. ही सेवा ऑक्टोबरच्या मध्यापासून पुन्हा सुरू होईल, असे स्पाइसजेटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही तिकीट दर चढेच
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील प्रवासासाठीही अनेक मार्गांवर तिकिटांचे दर वाढलेले दिसत आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनाही अधिक खर्चाची तयारी ठेवावी लागणार आहे.
विमान मार्ग
सध्याचे तिकीट दर
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील दर
पुणे ते बंगळुरू
५ ते ८ हजार रुपये
८ ते १२ हजार रुपये
पुणे ते दिल्ली
७ ते १० हजार रुपये
पुणे ते चेन्नई
६ ते १० हजार रुपये
७ ते ११ हजार रुपये
पुणे ते कोलकाता
१३ ते १५ हजार रुपये
१५ ते १८ हजार रुपये
दुबई ते पुणे
१२ ते १५ हजार रुपये
१७ ते २२ हजार रुपये
विमान प्रवासाचे वाढलेले दर आणि सणासुदीच्या काळातील गर्दी यामुळे पुणेकरांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगपूर्वी विविध विमान कंपन्यांचे दर तपासून प्रवासाचे नियोजन करावे लागत आहे.
