पुणे पोलिसांचा भन्नाट ‘ऑपरेशन अंघोळी’! चितळे–काका हलवाई चोरीतील आरोपींना घरात अंघोळीला येताच बेड्या, 225 CCTV तपासणीनंतर मोठा उलगडा

पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात घडलेल्या एका मिठाई दुकानातील चोरीचा पुणे पोलिसांनी अत्यंत वेगळ्या आणि हुशारीने केलेल्या तपासातून पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना थेट त्यांच्या घरातून, ते अंघोळीसाठी आले असताना अटक केली. या अनोख्या कारवाईमुळे संपूर्ण तपासाला ‘ऑपरेशन अंघोळी’ अशी चर्चा रंगली आहे.

१६ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास बाणेर भागातील प्रसिद्ध चितळे बंधू आणि काका हलवाई या मिठाई दुकानांमध्ये अज्ञातांनी शटर तोडून आत प्रवेश केला होता. लॉकरमधील देवपूजेसाठी ठेवलेले सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मिळून सुमारे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास सुरू केला. आरोपींनी गुन्ह्यानंतर शहरात फिरून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. ते स्पोर्ट्स बाईकवरून पुणे शहरातील शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, रामटेकडी, आळंदी, नऱ्हे आणि आंबेगाव परिसरात वारंवार फिरताना दिसले. त्यांचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 225 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

या सखोल तपासातून पोलिसांना आरोपींच्या दुचाकीचा क्लू मिळाला आणि त्यावरून त्यांच्या राहत्या घरापर्यंत पोहोचण्यास यश आले. मात्र, आरोपी चोरीनंतर सतत घरी थांबत नव्हते आणि फारच कमी वेळेस घरी येत होते. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की त्यातील एक आरोपी काही वेळासाठी घरी अंघोळ करण्यासाठी येणार आहे.

ही माहिती मिळताच पोलिसांनी अचूक सापळा रचला. आरोपी घरात पोहोचताच पोलिसांनी अचानक छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून दुसऱ्या साथीदाराची माहिती मिळाली आणि त्यालाही काही वेळातच अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिवम दत्ता अवचार (वय १९) आणि करण शिवाजी जमादार (वय १९) अशी आहेत. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून दोन महागडे मोबाईल, एक दुचाकी, दोन लोखंडी पालघन आणि १२ हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी दाखवलेल्या या चतुराईपूर्ण तपासामुळे गुन्हेगारांचा पर्दाफाश झाला असून परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. 225 सीसीटीव्हींचा अभ्यास, सातत्यपूर्ण ट्रॅकिंग आणि योग्य वेळी रचलेला सापळा यामुळे हा गुन्हा उघडकीस आला.