Pune News : मंगळवारपासून गोल्डन कार्डसाठी पॅनलवरील रुग्णालयात विशेष मोहीम – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
Pune News पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रा २०२३ अंतर्गत आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राज्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत इतर संबंधित शासकीय यंत्रणांनी गोल्डन कार्ड नोंदणी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी.
या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांच्या होईल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी केले. मंगळवारपासून गोल्डन कार्डसाठी पॅनलवरील रुग्णालयात विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई , क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. अमोल मस्के, आयुष्मान भारत योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती लोखंडे आदी उपस्थित होते.
डॉ. शेटे म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात गरजू लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना गोल्डन कार्ड वितरीत करून देण्याबाबत मोहीम सुरू आहे. याद्वारे रुग्णांना त्यांच्या जवळच्या रुग्णालयात आरोग्य उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. योजनेचा लाभ रुग्णांना देण्यासाठी त्यांना गोल्डन कार्ड देणे आवश्यक असल्याने कार्ड नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करावेत. हे कार्ड लाभार्थ्यांना दिल्याशिवाय योजनेचा लाभ त्याला देता येणार नाही. Pune News
गोल्डन कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी विशेष नियोजन करावे. महापालिका क्षेत्रात कार्डची नोंदणी कमी असल्याने महापालिकेने गोल्डन कार्डची संख्या वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा. धार्मिकस्थळाच्या ठिकाणी मोहिमेसाठी देवस्थान व्यवस्थापनाची मदत घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. संबंधित यंत्रणांनी या कामाला विशेष प्राधान्य द्यावे. सीएसई केंद्रांनी या योजनेच्या कामांच्या प्रगतीबाबत दररोजचा अहवाल सादर करावा आणि गोल्डन कार्ड नोंदणीच्या कामाला गती द्यावी.
पॅनलवरील रुग्णालयांनी गोल्डन कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्यावी. अधिकाधिक लोकसहभाग घेतांना चांगले काम करणाऱ्या गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांचा प्रत्येक आठवड्यात सन्मान करावा. चांगले काम करणाऱ्या गावांना जिल्हा परिषदेमार्फत पुरस्कार घोषित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रारंभी आयुष्मान भारत योजनेच्या डॉ.लोखंडे यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती सादर केली.
पुणे जिल्ह्यात आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ३८ लाख ५४ हजार लाभार्थ्यांपैकी ९ लाख ५ हजार लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात मोहीम स्तरावर १ लाख ६४ हजार कार्ड वितरित करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे या मोहिमेला वेग देण्यात आला आहे, अशी माहिती डॉ.लोखंडे यांनी दिली.