Pune News : रिक्षावर ध्वनीक्षेपक लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार, तिघा रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल…
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केलेले नसताना बेकायदेशीरपणे रिक्षावर फलक लावून ध्वनीक्षेपक लावून प्रचार करणार्या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोविंद सुदाम घाडगे (वय ३२, रा. त्रिमुर्ती कॉलनी, काळेपडळ), अप्पा रामा साळवे (वय ३६, रा. साईविहार कॉलनी, काळेपडळ), दत्तात्रय त्र्यंबक शितोळे (वय ५०, रा. जोगेश्वरी कॉलनी, काळेपडळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक अधीक्षक नागनाथ माने यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढवा येथील पारगे लॉन्स येथे रविवारी दुपारी तीन वाजता घडला आहे.
सविस्तर माहिती अशी की, आरोपींनी आपापल्या रिक्षांवर लोखंडी फ्रेम तयार करुन त्यावर घड्याळाचे चित्र, बॅनर लावून त्यावर विकासाची निशाणी घड्याळ असा मजकूर लिहला होता. या बॅनरवर प्रकाशक व मुद्रक यांच्या नावाचा उल्लेख नव्हता.
तसेच स्पिकरवर राष्ट्रवादी पुन्हा असे गाणे लावून घड्याळ चिन्हाचा विना परवानगी प्रचार करत होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन विना परवाना प्रचार करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.