Pune News : अखेर उरुळी देवाची, फुरसुंगी नगरपरिषदेचा मार्ग मोकळा, आयुक्तांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय…

Pune News : उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांना सर्व सोयी-सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना बैठकीत दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन्ही गावांना स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावे महापालिकेमधून वगळण्यात आल्यानंतर त्याविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. महापालिका संबंधित गावांना सोयी-सुविधा पुरवीत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांच्या या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात आली. Pune News
या बैठकीला महापालिका आयुक्त, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, पीएमआरडीएचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील बांधकामे नियमित करताना आकारावयाच्या शास्ती कराबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, महापालिकेत गावे समाविष्ट करताना तेथील मालमत्तांचे मूल्यांकन करताना मूळ मालमत्ता कर दुप्पटीपेक्षा जास्त होऊ नये यासाठी नगर विकास विभागाने धोरण तयार करावे.
दरम्यान, या दोन्ही गावांमध्ये पुणे महापालिकेकडून न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत सेवा पुरविण्यात याव्यात, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्वरित ही गावे महापालिकेतून वगळून पुढील निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना बैठकीत दिले असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे.