Pune News : पुणेकरांनो काळजी घ्या! आली डेंग्यू अन् चिकनगुनियाची साथ, रुग्णसंख्या वाढलीय, अशी घ्या काळजी..

Pune News पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच काही दिवसांपासून डेंग्यू , चिकुनगुनिया आणि उष्णतेमुळे होणारे आजार यांसारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजारांचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
या आरोग्यविषयक समस्यांचा नीट सामना करण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना या रोगांशी संबंधित लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या आणि कोणत्याही प्रकारचा ताप अंगावर काढू नका, असे आवाहनही महापालिकेने नागरिकांना केले आहे.
अशी घ्या काळजी..
वैयक्तिक स्वच्छतेचा सराव करा आणि परिसर स्वच्छ ठेवा.
घरामध्ये आणि आजूबाजूला न वापरलेल्या किंवा अनावश्यक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्याची खात्री करा.
वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणी आणि कीटकनाशक उपचार केलेल्या बेड नेटचा वापर केला जाऊ शकतो.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घरातील पाण्याचे भांडे आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करा.
घरांमधील पाण्याची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करा.
घराभोवती साचलेले पाणी सोडणं टाळा.
वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधक जाळी वापरा.
औद्योगिक क्षेत्र, बांधकाम स्थळे, कार्यालये, घरगुती आणि व्यावसायिक सोसायट्यांच्या विविध क्षेत्रात या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यावर महापालिका भर देत आहे.
दरम्यान, परिसरातील घातक भागात किंवा पाणी साचत असलेल्या भागांची माहिती पालिकेपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे आणि साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणंदेखील गरजेचे आहे. त्याचे पालन न केल्यास पालिका अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.