Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा राडा! पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, दोन गटांतील कार्यकर्ते भिडले..
Pune News : पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं. या घटनेचे जोरदार पडसाद उमटले आहेत. या घटनेचा भाजप युवा मोर्चाने जोरदार निषेध नोंदवला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन गट आमनेसामने आल्याने गोंधळ निर्माण झाला. भाजपकडून आंदोलन करण्यात येत होतं. याच आंदोलनात दोन विरोधी संघटना आमनेसामने आल्या. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना हा गोंधळ झाला. दोन गटांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. Pune News
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी एसएफआयचे कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. दोन्ही संधटनांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, दोन विद्यार्थी संघटना आमनेसामने आल्याने या परिसरात वातावरण निर्माण झाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर होस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीची पेंटिंग काढण्यात आली होती. यावेळी आक्षेपार्ह मजकूरही लिहिण्यात आला होता. या घटनेचा अभाविपने निषेध नोंदवला होता.
तसेच विद्यापीठाने तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन संबंधितांना अटक करून गुन्हे दाखल करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच अभाविपने दिला होता. मात्र, विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने अखेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली.