Pune News : गणपतीसाठी चहावल्याने कमी वर्गणी दिल्याचा राग, कार्यकर्त्यांनी केली बेदम मारहाण..

Pune News पुणे : लोणी स्टेशन येथे गणपती वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला दमदाटी करुन मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अशीच घटना समोर आली आहे. गणपतीसाठी कमी वर्गणी दिल्याने एका चहावाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली. (Pune News)

याप्रकरणी व्यावसायिक गणेश संतोष पाटणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, नीलेश दशरथ कणसे (वय. ३९) आणि अविनाश राजेंद्र पंडित (वय. ३२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील कॅम्प परिसरात महात्मा गांधी रोडवर गणेश संतोष पाटणे यांचे श्रीनाथ टी स्टॉल आहे. शनिवार( ता.२३) त्यांच्या दुकानावर १५ ऑगस्ट चौकातील गणपती मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी आले होते. यावेळी वर्गणीच्या रकमेवरुन कार्यकर्ते आणि गणेश पाटणे यांच्यात वाद झाला.

गणेश पाटणे यांनी गणेशोत्सवासाठी १५१ रुपयांची वर्गणी घेण्याची विनंती केली परंतु मंडळाचे कार्यकर्ते १००० रुपयांची वर्गणी मागत होते. याच कारणाने त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद वाढल्याने आरोपींनी टी स्टॉल चालकास बेदम मारहाण केली तसेच ‘तुझा धंदा कसा चालतो तेच बघतो…’ अशी धमकीही दिली.
या प्रकरणात गणेश पाटणे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
