पुणे महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनं राजकीय गणित बदलणार ; विद्यमान नगरसेवकांना धक्का..

पुणे : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.यामध्ये आता राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.त्यामध्ये पुणे
आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ४१ प्रभागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात आली. या सोडतीमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांच्या राजकीय गणितांमध्ये बदल झाला असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.काहींना कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचा किंवा खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवण्याचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. तसेच, काही ठिकाणी मोठे नेते एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेत एकूण १६५ जागांपैकी ८३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी २२, अनुसूचित जमातीसाठी २ आणि इतर मागासवर्गासाठी ४४ जागा राखीव आहेत. खुल्या प्रवर्गातील ९७ जागांपैकी ४९ जागा महिलांसाठी आहेत. या आरक्षणाच्या सोडतीमुळे काही नगरसेवकांच्या आरक्षित जागेवरील आरक्षणात बदल झाला आहे. यामुळे त्यांना नवीन रणनीती आखावी लागणार आहे.
आरक्षण सोडतीचा फटका – माजी उपमहापौर व नगरसेवक अडचणीत

आरक्षण सोडतीनंतर माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अविनाश बागवे, सनी निम्हण, युवराज बेलदरे, प्रकाश ढोरे आणि प्रकाश कदम यांना यावेळी सर्वसाधारण गटातून लढावे लागणार आहे.
तीन माजी उपमहापौर आणि दोन्ही माजी महापौर ‘आऊट’
यापूर्वीच्या सभागृहातील माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सरस्वती शेंडगे आणि सुनीता वाडेकर यांच्या प्रभागांतील जागा अनुक्रमे महिला किंवा खुल्या गटासाठी खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे हे तिघेही सभागृहाबाहेर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.२०१७ नंतरच्या कार्यकाळात महापौर झालेल्या मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ यांनाही या वेळी सभागृहात पाहायला मिळणार नाही. टिळक यांचे निधन झाले असून मोहोळ सध्या खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत.
‘पदोन्नती’मुळे बाहेर – पाच आमदार महापालिकेत दिसणार नाहीत
२०१७ नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये माजी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, आणि हेमंत रासने हे आमदार झाले आहेत. त्यामुळे हे पाच जण सभागृहात नसतील.कसबा पोटनिवडणुकीत आमदार झालेल्या रविंद्र धंगेकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करला आहे, त्यामुळे ते पुन्हा महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता कमी आहे.
‘धंगेकर विरुद्ध बिडकर’ हायव्होल्टेज सामना होणार नाही
२०१७ मध्ये चर्चेत आलेला रविंद्र धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर हा हायव्होल्टेज सामना यावेळी होणार नाही. प्रभाग क्रमांक २४ मध्ये यावेळी ओबीसी महिला आरक्षण पडल्याने धंगेकर यांच्या पत्नीला संधी मिळू शकते, परंतु बिडकर यांना सर्वसाधारण गटातून लढावे लागणार आहे. मागील निवडणुकीत धंगेकर यांनी मोदी लाटेच्या काळात बिडकर यांचा पराभव केला होता.