पुणे महापालिका आरोग्याच्या दृष्टीने करणार मोठा खर्च, ‘या’ ६ रुग्णालयांचा होणार कायापालट, ५०० खाटा वाढवणार…


पुणे : पुणे महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचा कायापालट करून तेथील उपचारांच्या खाटांची संख्या वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत पंधरा कोटी रुपयांहून अधिक खर्च या रुग्णालयांवर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा रुग्णालयांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून, त्यातून अंदाजे पाचशे खाटांची भर पडणार असल्याची माहिती आहे.

पुणे शहराची लोकसंख्या ५० लाखांच्या घरात असताना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जेमतेम पाचशे ते सहाशे खाटा उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या २५ लाख इतकी असताना तेथे १,३०० खाटा उपचारांसाठी आहेत. महापालिकेच्या बहुतांश रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटा आणि उपचार करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या खाटांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी या सर्व रुग्णालयांचे सर्वेक्षण करून घेतले असून, जुजबी डागडुजी केल्यानंतर कार्यान्वित खाटांची संख्या वाढणार आहे.

पहिला टप्पा सहा रुग्णालयांचा

कमला नेहरू रुग्णालय, कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे रुग्णालय, कै. चंदुमामा सोनवणे रुग्णालय, डॉ. दळवी रुग्णालय, कै. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा, संजय गांधी रुग्णालय, बोपोडी या सहा रुग्णालयांमध्ये तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या भवन आणि आरोग्य विभागाकडून एकत्रित आराखडा तयार करण्यात आला आहे.

या रुग्णालयांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर ४४० खाटांची भर पडणार आहे. पहिल्या टप्प्यात जरी सहा रुग्णालये घेण्यात येणार असली तरी टप्प्याटप्प्याने सर्वच रुग्णालयांची डागडुजी करण्यात येणार आहे. या आर्थिक वर्षात महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर अधिक लक्ष देण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने करोनाकाळात नागरिकांना केलेल्या आवाहनानंतर मोठ्या प्रमाणात ‘सीएसआर’ निधी मिळाला होता. त्यातील सात कोटी रुपये शिल्लक आहेत. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी हे सात कोटी रुपये आरोग्य विभाग आणि भवन विभागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भवन विभागाकडून रुग्णालयांची डागडुजी करण्यात येत आहे.

आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, तर आरोग्य विभागाकडून या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ, औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर येथे उपचार करणे शक्य असलेल्या खाटांची संख्या वाढणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

रुग्णालयाचे नाव व खाटांची संख्या..

कमला नेहरू रुग्णालय ४०० २७० पाच कोटी
कै. मुरलीधर लायगुडे रुग्णालय १०० १० दीड कोटी
डॉ. दळवी रुग्णालय १२० १५ एक कोटी
कै. राजीव गांधी रुग्णालय १०० ५५ ५० लाख
कै. चंदुमामा सोनवणे रुग्णालय १०० ७६ अडीच कोटी

संजय गांधी रुग्णालय, बोपोडी ७५ ०० ५० लाख
कै. अण्णासाहेब मगर प्रसूतिगृह, हडपसर ०० ०० ५० लाख
छत्रपती प्रसुती गृह, हडपसर ०० ०० २५ लाख
डॉ. होमी भाभा रुग्णालय ०० ०० एक कोटी ६० लाख

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!