Pune Misal : पुण्यात तयार होणार वीस हजार किलोची मिसळ, कारण काय?
Pune Misal : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून तब्बल २० हजार किलोंची मिसळ तयार करण्यात येणार आहे.
दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने ११ आणि १४ एप्रिल रोजी अनुक्रमे गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा आणि पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना मिसळ वाटप होणार आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे गुरुवारी (ता. ११) १० हजार किलो मिसळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे १४ एप्रिल सकाळी ७ पासून १० हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्याचा उपक्रम होणार आहे.
पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या – वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून तब्बल २० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. Pune Misal
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर २० हजार किलोची मिसळ तयार करणार आहेत. अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईचा वापर मिसळ तयार करण्यासाठी होणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने हा उपक्रम होणार आहे, अशी माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे.