Pune : मजूर गुऱ्हाळात उसाच्या गरम रसात पडला, सहकाऱ्यांनी बाहेर काढून नदीत फेकलं! शिरूरमधील धक्कादायक प्रकार…

Pune : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिऊन कामावर आलेल्या मजुराचे त्याच्याच दोन सहकाऱ्यांसोबत भांडण झालं, या झटापटीमध्ये हा मजूर तोल जाऊन गुऱ्हाळातील उसाच्या गरम रसात पडला.

या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला रसाच्या बाहेर काढल्यानंतर दवाखान्यात घेऊन जातो असे सांगण्यात आले, मात्र त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी नदीत फेकून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात गुऱ्हाळ मालकानं दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरजू असं हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे तर शेरसिंग ओमबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर (मूळ गाव शीतलगढी, जिल्हा शामली उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावं आहेत. ही घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे असलेल्या एका गुऱ्हाळात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गावात फिर्यादीचं गुऱ्हाळ आहे. या गुऱ्हाळावर हे मजूर काम करत होते. Pune
त्यातील एक मजूर सरजू हा 29 सप्टेंबरला रविवारी पहाटे दारू पिऊन कामाच्या ठिकाणी आला. त्यानंतर त्याचा शेरसिंग ओमबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर यांच्यासोबत वाद झाला. झटापटीत तोल जाऊन सरजू हा गुऱ्हाळाच्या कढाईत पडला.
दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या सरजूला रुग्णालयात घेऊन जातो असं आरोपींनी सांगितले मात्र त्याला रुग्णालयात न नेता भीमा नदी पात्रात फेकून दिऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुऱ्हाळ मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.