पुणे- दौंड लोहामार्गावर आता रेल्वे सुसाट धावणार! रेल्वे गाड्यांना १३० च्या वेगाची मंजुरी…

पुणे : पुणे-दौंड रेल्वे प्रवासात १० मिनिटांची बचत होणार आहे. पुणे-दौंड दरम्यानच्या मार्गावरून रेल्वे गाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने धावतील, असे आदेश मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी पुणे विभागाला दिले आहे.
सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार असून पुणे-दौंड-पुणे हा प्रवास वेगवान होणार आहे, अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. पुणे-दौंड रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी रुळांची क्षमता वाढविण्यात आली आहे.
मध्य विभागाचे मुख्य संरक्षक आयुक्त मनोज अरोरा यांनी या मार्गाची तपासणी करून काही सूचना दिल्या होत्या. पुणे रेल्वे प्रशासनाने त्या सूचनांची पूर्तता केली. त्यानंतर मुख्य संरक्षक आयुक्तांकडून या मार्गाला हिरवा कंदील मिळाला आहे.
त्यानंतर मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी देखील या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रेल्वे गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
दरम्यान, पुणे-दौंड लोहमार्गावर ताशी १३० किमी वेगाची मंजुरी मिळाली असून सोमवारपासून काही गाड्या या वेगाने धावणार आहेत. नंतर काही दिवसांत या सेक्शनमध्ये सर्व प्रवासी गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावतील.