Pune Crime News : रेल्वे सुरक्षा दलातील हवालदाराने छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार..


Pune Crime News पुणे : पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रियकरासोबत छत्तीसगडवरुन पुण्यात आलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) पोलीस हवालदारासह दोघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Pune Crime News

आरोपींनी मुलीच्या प्रियकराकडून पैसे उकळून त्याला सोडून दिले. तर मुलीला डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान एका संस्थेच्या कार्यालयात घडला आहे.

याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदार अनिल पवार व संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश ) याला अटक केली आहे. तर पोलीस हवालदार अनिल पवार पसार झाला असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत असून ती छत्तीसगड राज्यातील बेमेतारा जिल्ह्यात कुटुंबासह राहते. तिचे मित्रासोबत प्रेम संबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. दोघे जण छत्तीसगडमधून पसार झाले.

त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती. छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर हे ९ सप्टेंबर रोजी पुण्यात येण्यासाठी निघाले. १२ सप्टेंबर रोजी ते पुणे रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यावेळी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्यात त्यांनी त्या दोघांना पोलिसांकडे नेले. त्याठिकाणी पोलीस गणवेशात अनिल पवार हा कर्मचारी होता.

अनिल पवार याने पीडित मुलीला व लिलीधर यांना बराच वेळ बसवून ठेवले. मुलगी अल्पवयीन असल्याने रेल्वे सुरक्षा दलाने तिला एका संस्थेत ठेवले. संबंधित संस्था ताडीवाला रस्ता भागात असून, या संस्थेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आहे. पुणे रेल्वे स्थानकात सापडलेल्या अल्पवयीन मुलांना या संस्थेत दाखल करण्यात येते.

पीडित मुलीला संस्थेत दाखल केल्यानंतर पोलीस हवालदार पवार आणि संस्थेतील कर्मचारी तिवारी यांनी मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, अल्पवयीन मुलगी सापडल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी छत्तीसगड पोलिसांना दिली. छत्तीसगड पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

मुलीकडे चौकशी केली असता तिने पोलीस हवालदार पवार आणि संस्थेतील कर्मचारी तिवारी यांनी बलात्कार केल्याची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी छत्तीसगड स्थानिक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

हा गुन्हा पुणे रेल्वे स्थानक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि पथकाने तात्काळ तपास करुन तिवारी याला बेड्या ठोकल्या. तर गुन्ह्यातील आरोपी पोलीस हवलदार पवार फरार झाला आहे. पुढील तपास लोहमार्ग पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी देवीकर करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!