Pune Crime : क्रिकेट खेळताना वादात केली मध्यस्थी, महिलेला कोयत्याने मारहाण, पुण्यात धक्कादायक प्रकार..

Pune Crime : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली, तसेच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दोघांवर काेयत्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
तसेच याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (ता.३०) सायंकाळी सहाच्या सुमारास येरवड्यातील मनोरुग्णालयासमोरील मैदानात घडली.
हुसेन अस्लम खान, आमिर अस्लम खान, अस्लम हैदर खान, शोएब रशीद कुरेशी, वीरेन वाघेला, स्टीफन जाॅन्सन शिरसाठ (सर्व रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकणी ५१ वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, किक्रेट खेळताना आरोपींचा विल्सन मरिअन याच्याशी वाद झाला. वादातून त्यांनी विल्सनला मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी तक्रारदार महिला, तिची छोटी बहीण, तसेच हरीश बबन काळे, यशवंत बबन काळे भांडणे सोडविण्यासाठी गेले.
तेव्हा आरोपी आमिर खान याने घरातून कोयता आणि कुकरी आणली. आरोपींनी हरीश काळे यांना कोयत्याच्या दांड्याने मारहाण केली. यशवंत काळे यांच्या खांद्यावर कोयत्याचा दांडा मारला. आरोपींनी तक्रारदार महिलेच्या छोट्या बहिणीशी अश्लील कृत्य केले. त्यावेळी महिलेच्या दोन मुली तेथे आल्या. त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. Pune Crime
दरम्यान, पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवे मारू, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक तुषार दोडमिसे तपास करत आहेत.