Pune Crime : मुलगा होत नसल्याने सतत दिला जात होता त्रास, महिलेची गळफास घेऊन संपवलं आयुष्य, चाकण येथील धक्कादायक घटना..

Pune Crime : चाकण येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मुलगा होत नसल्याने सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून 36 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (ता.२) दुपारी एकच्या सुमारास खंडोबा माळ चाकण येथील गुप्ता चाळीत घडली आहे.

याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ शाम मोहन लंचु गुप्ता (वय.२८ रा. मु.पो. भिती चौक भिटी ता.जि. मऊ उत्तर प्रदेश) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, मयत महिलेचा पती सचिन सुभाष गुप्ता, सासरे सुभाष देवनारायण गुप्ता, सासु (सर्व रा. खंडोबामाळ, गुप्ता चाळ, चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची बहीण हिला आरोपींनी माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास दिला. त्यानंतर चार मुली झाल्या पण मुलगा झाला नाही या कारणावरून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. Pune Crime

दरम्यान, सासरच्या मंडळींच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. चाकण पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मडके करीत आहेत.