११ पुरावे द्या नाहीतर रेशनकार्ड होणार रद्द! राज्यात बोगस रेशनकार्ड शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू..

अहिल्यानगर : जिल्ह्यात अपात्र रेशनकार्डधारक शोधण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू झाली असून संपूर्ण एक महिना चालणाऱ्या या मोहिमेत बोगस शिधापत्रिका धारकांची छाननी केली जाणार आहे.
तसेच यामध्ये परदेशी नागरिक, विशेषतः बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटल्यास त्यांच्या नावावरील कार्डे तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी रेशन दुकानदारांना केंद्रबिंदू ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, ग्राहकांना नमुना फॉर्म हे दुकानदार विनामूल्य पुरवतील. फॉर्मसह वर्षभराच्या वास्तव्याचा पुरावा अनिवार्य असून, एकूण ११ प्रकारांतील कोणताही एक अधिकृत दस्तऐवज सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वास्तव्याचा पुरावा सादर न केल्यास ग्राहकांना १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. मुदतीत पुरावा न दिल्यास संबंधिताचे रेशनकार्ड रद्द होईल. त्यासाठी हमीपत्रही आवश्यक असून, ते सादर केल्यानंतरच ग्राहकाला पावती दिली जाईल.
लागणार हे पुरावे..
भाडे करारनामा, निवासस्थानाचे मालकी हक्काचे कागदपत्र, गॅस कनेक्शन बिल, बँक पासबुक, वीज/टेलिफोन/मोबाईल बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, कार्यालयीन ओळखपत्र, मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.
दरम्यान, छाननीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यावर आधारित अर्जांची दोन गटांमध्ये विभागणी होणार आहे. ‘अ’ गटात सर्व कागदपत्रे पूर्ण असलेले अर्ज समाविष्ट होतील आणि त्या ग्राहकांचे रेशनकार्ड पूर्ववत राहील. तर ‘ब’ गटात अपूर्ण माहिती असलेले अर्ज टाकण्यात येतील आणि त्यांच्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.