दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव येथील विस्तारित बाजार आवारासाठी २० एकर गायरान जमीन मंजूर! आमदार राहुल कुल यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे मानले आभार


दौंड : तालुक्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला असून, मौजे केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील गट क्र. ११८/१अ मधील सुमारे २० एकर शासकीय गायरान जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड या समितीस विस्तारित बाजार आवार (मार्केटयार्ड) उभारणीसाठी नाममात्र रु. १ दराने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केडगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विस्तारित, सुसज्ज व आधुनिक आवार उभारण्यासाठी शासन स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, महसूल विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन ज्ञापन नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

केडगाव व परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता येथे स्वतंत्र व सुसज्ज कृषी बाजार आवार असणे अत्यंत आवश्यक होते. यापूर्वी या ठिकाणी १० एकर जागा तत्कालीन आमदार सुभाष कुल यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर करण्यात आली होती. या निर्णयामुळे दौंड तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे दौंड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, बाजार समितीचे सभापती, संचालक व नागरिकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो असे आमदार कुल यावेळी म्हणाले आहेत

केडगाव येथे बाजार समितीचे विस्तारित बाजार आवार उभारल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, तसेच शेतकऱ्यांना व्यापाराला मोठी चालना मिळेल. या निर्णयाबद्दल संपूर्ण दौंड तालुक्यातून समाधान व्यक्त केले जात असून आमदार राहुल कुल यांचे अभिनंदन होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!