खाजगी सावकारांचा सुळसुळाट!! दरमहा चक्क २० टक्के व्याज, भिगवणमध्ये दोघांवर गुन्हा दाखल…


इंदापूर : भिगवण मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यामध्ये डोळे विस्फारणारा प्रकार उघडकीस आला आहे. १ लाख १७ हजार रुपयांचे दरमहा २० टक्के व्याजाने पैसे आकारणाऱ्या दोन खाजगी सावकारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रेम जगताप व रेश्मा जगताप अशी यांची नावे आहेत. तसेच दौंड तालुक्यातील राजेगाव येथील दिपाली गायकवाड यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम जगताप व रेश्मा जगताप यांनी दिपाली गायकवाड यांना दिलेल्या १ लाख १७ हजार रुपयांचे दर २० टक्क्यांनी प्रति महिना व्याज आकारले.

फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार २ लाख ४० हजार रुपये रोख व १ लाख ४९ हजार रुपये ऑनलाईन दिल्यानंतर एकूण ३ लाख ८९ हजार रुपयांची परतफेड केली. मात्र तरी देखील ६ लाख ८० हजार रुपये गायकवाड यांच्याकडे हे दोघेजण मागत होते.

फक्त पैशाचीच मागणी करून हे थांबत नव्हते तर शिवीगाळही करत होते त्यामुळे गायकवाड यांनी घाबरून पोलिसांकडे धाव घेतली. व्याज आकारणीचा हा अजब प्रकार ऐकून पोलीस देखील चक्रावले. त्यांनी वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.

दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून बारामती आणि इंदापूर तालुक्यात खाजगी सावकारांनी हैदोस घातला आहे. त्यांचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण नगण्यच आहे. बहुसंख्य खाजगी सावकार हे गुंडांच्या टोळ्या पाळत असल्याने व अगोदरच जमिनी अथवा प्लॉट अथवा घरे लिहून घेत असल्याने आणि हेच खाजगी सावकार विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी बनत असल्याने तक्रार कुणाकडे दाखल करायची म्हणून हतबल लोक गप्प बसत आहेत.

अनेकांकडे अल्पावधीत आलिशान चारचाकी गाड्या, आलिशान बंगले दिसू लागल्याने ही खाजगी सावकारी दरमहा किती टक्के व्याजदर आकारत असेल? याची फक्त कल्पनाच केलेली बरी. गुन्हे दाखल होत नसल्याने त्याची फारशी चर्चा होत नाही मात्र बारामती व इंदापूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या कारनाम्यांची कुजबूज मात्र मोठी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!