‘भांडण थांबवायला गेला, पण शिक्षा त्यालाच!’ तिसरीतील चिमुकल्याचा गळा दाबला, हात चावला; प्राचार्यांवर JJ Act अंतर्गत गुन्हा

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वर्गातील वादाची माहिती शिक्षकांना देणाऱ्या तिसरीतील अवघ्या आठ वर्षीय विद्यार्थ्यालाच प्राचार्यांनी अमानुष शिक्षा दिल्याचा आरोप समोर आला आहे. विद्यार्थ्याचा गळा दाबून काही सेकंद हवेत उचलणे, त्याच्या हाताचा चावा घेणे आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी संबंधित प्राचार्य गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात बाल न्याय (JJ Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरालगतच्या खासगी शाळेत तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रारीनुसार, वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू होते. संबंधित विद्यार्थ्याने हा प्रकार वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर वर्गशिक्षिकांनी प्राचार्यांना वर्गात बोलावले.

प्राचार्य वर्गात आल्यानंतर त्यांनी आधी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर त्यांनी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यालाच लक्ष्य केले. “भांडण कसे करतात ते दाखवतो,” असे म्हणत त्यांनी मुलाचा गळा पकडून हवेत उचलल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तक्रारीनुसार, सुमारे 20 सेकंद एक ते वीस आकडे मोजत विद्यार्थ्याला हवेत धरून ठेवण्यात आले. खाली सोडल्यानंतर त्याच्या हाताचा चावा घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


घरी आल्यानंतर मुलाच्या हातावरील जखम आणि त्याची घाबरलेली अवस्था पाहून कुटुंबीयांना प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. या घटनेबाबत पालकांनी प्राचार्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, “माझ्याकडून चुकून ही घटना घडली, मी लेखी माफी मागतो,” असे त्यांनी सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
मात्र, ही बाब केवळ माफीवर थांबवण्यास पालकांनी नकार दिला. विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी शाळेत मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित प्राचार्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “शाळा ही मुलांसाठी सुरक्षित जागा असावी. अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगर तालुका पोलिसांनी बाल न्याय कायद्याअंतर्गत (JJ Act) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेला कायद्याने बंदी असतानाही अशा घटना वारंवार समोर येत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. या प्रकरणामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शिक्षण विभागानेही याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.