किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीची तयारी जोरात, यंदा प्रथमच शासनस्तरावर होणार जयंती
पुणे : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज जयंती ही किल्ले शिवनेरीवर साजर्या होणार्या शिवजयंतीच्या धर्तीवर शासनाने साजरी करावी. याबाबत मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती.
यामुळे आता किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा सोहळा यंदा प्रथमच शासनस्तरावर आयोजित केला जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या या मागणीला मान्यता देत या वर्षीपासूनच त्याची सुरवात करू, असे जाहीर केले.
पुरंदर-हवेलीसह राज्यभरातील शंभूप्रेमींनीदेखील यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता. संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य सांभाळताना मराठी साम्राज्यात मोठी वाढ देखील केली.
त्यांचे बलिदान हा मराठी माणसाच्या अंत:करणातील एक हळवा भाग बनला आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.