अखेर प्रतीक्षा संपली! पंतप्रधान किसान निधीचा 14 वा हप्ता आज येणार खात्यात, पंतप्रधानांच्या हस्ते वितरण होणार..

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला जाणार आहे. अनेक दिवसापासून शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते मात्र आता हा हप्ता आज जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. राजस्थानमधील सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे PM किसानचा १४ वा हप्ता वितरीत केला जाणार आहे. याबाबतची माहिती विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये यांना दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणं तीन समान हप्त्यात प्रती वर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यात येतो.
२७ जुलै रोजी महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारणत: १ हजार ८६६ कोटी ४० लाख रुपये इतका लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.