Pooja Khedkar : हातात बंदूक घेत धमकी, सोबत बाउन्सर, IAS पूजा खेडकर यांच्या आईचा गावकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावतानाचा व्हिडीओ व्हायरल…


Pooja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मनेरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत असून त्या गावातील काही शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसून येत आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर आरेरावी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमधील महिला IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर असल्याचंच सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये त्या एका गावातील काही शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचे काही अंगरक्षकदेखील दिसून येत आहेत. एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

हा व्हिडीओ मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातला असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिला हातात पिस्तुल घेऊन गावकऱ्यांना धमकावत आहे. त्यांच्या बाजूला त्यांचे अंगरक्षकही दिसत आहेत. काही शेतकरी ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही असं करू शकत नाहीत’, असे सांगताना ऐकू येत आहेत.

पण त्याचवेळी ‘मला कायदा सांगू नका, मला माहिती आहे सगळं, सातबाऱ्यावर माझं नाव आहे’, असे त्या गावकऱ्यांना सांगत आहेत. धडवली गावात खेडकर कुटुंबाने २५ एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे तिथल्या गावकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला होता, असे सांगितले जात आहे.

या वादावेळी त्या गावात बाऊन्सर घेऊन गेल्या व त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकावल्याचंही बोललं जात आहे. मात्र, या प्रकरणात कोणतीही तक्रार मात्र नोंदवली गेली नसल्याचं सांगितलं जात आहे. Pooja Khedkar

दरम्यान, आता याच व्हिडिओवरून त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोरमा खेडकर यांच्या दमदाटीच्या व्हिडिओची आता तपासणी होणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस या व्हिडिओची तपासणी करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

पिस्तूलचा अधिकृत परवाना मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे का? हे देखील तपासले जाणार आहे. तो व्हिडीओ नेमका कधीचा आहे? याबाबतही तपासणी होणार असून पौड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!