Politics News : इंदापूर गेला मावळ गेला शिरुर-हवेलीचे काय? पुणे जिल्ह्यात भाजप दौंड तालुक्याच्या पुरता उरणार काय…!!


जयदीप जाधव

Politics News उरुळीकांचन : एकहाती राज्यात सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला पुणे जिल्ह्यात हर्षवर्धन पाटील यांच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. गेली पाच वर्षापूर्वी भाजपात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात भाजपचं स्थान बळकट करण्यासाठी पक्षात प्रवेश करुन घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांना यंदाच्या जागावाटपात संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाजपला पुणे जिल्ह्यात घरघर लागण्याची शक्यता असून भाजपचे अस्तित्व असलेल्या मावळची जागा मिळण्याची शक्यता मावळली असून शिरुर -हवेलीच्या जागेचे काय होणार म्हणून पक्षात अस्वस्थता पसरण्यास सुरुवात झाली आहे.

 

राज्यात भाजप व राष्ट्रवादी एकत्र येतील असा स्वप्नातही न वाटणाऱ्या भाजपला आता पुणे जिल्ह्यातील जागावाटपावरून चिंतन करण्याची वेळ आली आहे. राज्यात एकहाती सत्ताकेंद्राचे लक्ष साधण्यासाठी मागील पाच वर्षात पक्षात अनेक प्रयोग केले गेले. दारामाघून आलेल्यांना आमदारकी, महामंडळे, पक्षसंघटनेत स्थान अगदी राज्य नव्हे तर केंद्राच्या माध्यमातून मोठी ताकद देण्यात आली. हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद तसेच त्यांच्या कर्मयोगी व नीरा-भिमा साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एनसीडीसीचे ३०० कोटींचे कर्ज, कन्या अंकिता पाटील यांना भाजप युवा मोर्चाची जबाबदारी देऊन त्यांच्या मागे सत्ताकेंद्र उभी करण्यात आली. मात्र भाजपला जागा सुटणार नाही म्हणून त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला आहे. Politics News

 

अशीच परिस्थिती मावळ तालुक्याची असून मावळात ऐकेकाळी भाजपचा अभेद्य गड एका पराभवाने राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेस मधू़न भाजपात आणलेले अनेक पदाधिकारी भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड -आळंदीत असाच प्रकार घडला असून विधानसभेची दावेदारी माघितलेले अतुल देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सामील झाले आहे. अशीच परिस्थिती जुन्नर, पुरंदर तालुक्यात निर्माण झाली आहे.

 

भाजपला जनसंघाच्या रुपाने पहिला आमदार देणाऱ्या शिरुर मतदारसंघाबाबत चित्र वेगळे नसून स्व. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दोनवेळा सर केलेला भाजपचा गड जागा वाटपात हातात राहतोय की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.या ठिकाणी महायुतीत जागा वाटपात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे स्पर्धेत टिकेल असा उमेदवार स्वतः हा कडे नसतानाही त्यांनी जागा मिळविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दौंड ही ग्रामीणची जागा वगळता भाजपकडे जिल्ह्यात जागावाटपात अन्य कोणती जागा राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

शिरुर-हवेलीत यंदाच्या निवडणुकीत भाजपला मोठी आशा आहे. स्थानिक पातळीवर या मतदारसंघात भाजपचा उमेदवार प्रदिप कंदांच्या रुपाने हवेली तालुक्याचा असणार आहे. हवेली तालुक्याची मतदानसंख्या ३६ हजारांनी वाढली आहे. या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समिकरणांत संभाव्य फूट पाहता भाजपला फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र जागावाटपात भाजपला अद्याप वेटींवर ठेवल्याने जागेबाबत विलंब होत असल्याने भाजपकडून लढाईत उतरलेले प्रदिप कंद यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. संभाव्य लढतीचे चित्र तयार होत नसल्याची मतदारसंघाची परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऐकेकाळी राष्ट्रवादीला टक्कर देण्याची ताकद निर्माण होऊ पाहणाऱ्या भाजपचा जणाधार उरणार की नाही अशी आवस्था महायुतीच्या जागावाटपामुळे होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!